बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

वाढदिवस !

का मित्राचा वाढदिवस विसरलो म्हणून सहजच गेला महिना पडताळून पहिला आणि लक्षात आलं कि गेल्या महिन्यात तीन वाढदिवस होऊन गेले . 

पहिला वाढदिवस आपल्या सर्वांच्या नित्य वापरातल्या "गुगल" चा . यांत्रिक गोष्टीचा वाढदिवस साजरा झाला. . जगभरात 'गुगल'चा  वाढदिवस मोठ्या दिमाखात वेगवेगळ्या पद्धतीने जरा केला गेला . 

दुसरा वाढदिवस म्हटलं तर फार मोठा आणि म्हटलं तर . . . . 
असो, आपल्या देशाचे लाडके (?) पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांचा वाढदिवस हि झाला . 

गल्लीबोळातल्या नेत्यांच्या वाढदिवसाला शेकडो फ्लेक्स लावून शहर बकाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपला सर्वोच्च नेता आणि त्यांच्या वाढदिवसाचाही सोयीस्कर विसर पडावा , हि खूप मजेशीर अशी बाब आहे. 
पण आपल्या या सर्वोच्च नेत्याला  दिल्ली दरबारी  दिल्या जाणाऱ्या  वागणूकीचाच कित्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी,स्थानिक नेत्यांनी  गिरवल्याचे दिसले . निदान या एका बाबतीत तरी दिल्ली पासून गल्ली पर्यंत 'एकात्मतेचे' अभिनव दर्शन देशाला या निमित्ताने घडले . 

तिसरा वाढदिवस - २ ८ सप्टेंबर ! या दिवसाचं महात्म्य खूप मोठ … 
ज्वलंत आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या अशा एका महान क्रांतिकारकाचा जन्मदिवस . 

शहिद  भगत सिंग- नुसत नाव घेतलं तरी त सळसळून उठत आणि छाती अभिमानाने भरून येते . 
   
महिन्याच्या पहिल्या तारखेची आतुरतेने वाट बघणारा या देशातला युवा वर्ग गेल्या महिन्यात मात्र भारतमातेच्या चरणावर आपलें  प्राण अर्पण करणाऱ्या या थोर देशभक्ताला विसरला होता . 

त्यामुळे शहिद भगत सिंगांच्या जन्मदिनी मला प्रकर्षाने 'गुलाल' या हिंदी चित्रपटातले एक विडंबन गीत आठवले . . . 

" आज का लौंडा ये केहता . .  हम तो बिस्मिल थक गये  !

  अपनी आझादी तो भय्या , लौंडिया कि दिल में हैं .. 

  सरफरोशी की तमन्ना अब ना  किसी के दिल में हैं  !!! "  

भारतमातेच्या स्वतंत्रतेकरिता आपल्या  प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकाच्या वाटेला हि उपेक्षा यावी. . यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं ? 
पण नेत्यांचे ,नट-नट्यांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या नव्हे तर त्यांची मंदिरे उभारणाऱ्या समाजाकडून काय अपेक्षा करावी ?

या तीन ही वाढदिवसात एक साधर्म्य मात्र नक्कीच आहे. 
गुगल ' या शोध यंत्राचा 'यंत्रवत' वाढदिवस . देशाच्या सर्वोच्च (?) नेत्याला 'यंत्रवत' असल्याची जाणीव करून देणारा वाढदिवस आणि बधिर झालेल्या समाजमनाने 'यंत्रवत'पणे "न" साजरा केलेला एका अन क्रांतिकारकाचा वाढदिवस !

नट नट्या- सिनेतारकांच्या वाढदिवसाला त्यांच्या कारकीर्दीचं भरभरून वर्णन करणाऱ्या इलेक्ट्रोनिक मिडियालाही या तीनही वाढदिवसात टीआरपी नसल्याने फारसं लक्ष द्यावसं वाटलं नाही . 

शहिद भगतसिंगांच्या  जयंती समारोहाच्या एखाद  दुसऱ्या कोपऱ्यात झालेल्या कार्यक्रमापेक्षा "  ग्रांड मस्ती " ला आजचा युवक तुडूंब गर्दी करत होता . 

'शोकांतिका' हा शब्दही थिटा पडावा , अशीहि आजची विदारक परिस्थिती  आहे.

आज जर रामप्रसाद बिस्मिल हयात असते तर त्यांनी शहीद भगतसिंगांना नक्की विचारलं असतं कि "ते" कोणतं स्वप्न होतं 'भगत ' जे तू  या देशासाठी इथल्या लोकांसाठी पाहिलं होतस ?

ज्या स्वराज्यासाठी तू लढलास . . त्याचं आजचं हे भीषण वास्तव बघण्यासाठी तू थांबायला हव होतसं भगत !

मित्रानों , आज तर काही लोक यापेक्षा इंग्रजाचं राज्य बरं होतं असे म्हणू लागले आहेत . 
काय वाटत असेल हे ऐकून भगतसिंगांच्या  आत्म्याला . . . 

खादीचे कपडे परिधान केलेल्या राजकीय नेत्यांना गांधीजींच्या फोटो असलेल्या नोटांचे घातले जाणारे हार . . 
इंग्रजांच्या क्रिकेट मध्ये उद्योगपतींनी पैसे लावून  घेतलेल्या कोंबड्यांच्या झुंजी …. 
मस्तवाल धनिकांच्या व नट नट्यांच्या बेफाम गाडीखाली चिरडले मरणारे  निष्पाप जीव ….
कॅश -करप्शन-क्रिमिनल या "सी " कल्चरने व्यापून गेलेलं राजकारण . . . . . 
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं सरकार . . . . 
माता -भागिनींवर राजधानीतच होणारे पाशवी बलात्कार . . . . 
गुंडांना समाजात मिळणारी प्रतिष्ठा .. 
मूल्यांच अध:पतन आणि नैतिकतेचा झालेला ऱ्हास . . . 

. . आणि हे सारं काही टी.व्ही वर "एन्टरटेनमेंट "म्हणून बघणारा या देशाचा तटस्थ नागरिक  .  .   . 

खरच, हे सगळं पहायला आज भगतसिंग हवे होते का ? 

क्रांतिकारकांच्या असीम त्यागापेक्षा नट नट्यांच्या ,सिनेतारकांच्या अनैतिक संबंधानाच जिथे बहुचर्चित प्रतिष्ठा आहे . 
जिथं गुंड हे समाजसेवक आहेत ,त्यांना समाजात मोठा मान आहे. जिथं विनासायास आणि फुकट मिळालेली गोष्ट म्हणजे "स्वातंत्र्य" आहे . 
अशा समाजातून राष्ट्रप्रेमाने भारावलेली नवीन पिढी आपण कशी निर्माण करणार आहोत ? 

सुखासाठी ' स्वातंत्र्याचे ' व आरामासाठी ' आझादीचे ' दान करू पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. 
पाश्चिमात्यांच्या 'भोग ' संस्कृतीची पकड कायम आहे . 
गोरे गेले . . . . काळे आले ! 
परंतू इंग्रजांची प्रवृत्ती कायमच आहे . . . . म्हणूनच "चलेजाव " किंवा "करेंगे या मरेंगे " हे आंदोलन आजही संपलेले नाही . 

मित्रांनो , ज्या नरदुर्गांनी आपल्या सर्वस्वाची होळी करून आपल्या प्राणांची आहूती दिली . त्यांचीच स्वप्नं आज पायदळी तुडवली जातायत  .  . 

हे स्वातंत्र्य , हि हुतात्म्यांची स्वप्नं घट्ट धरून ठेवावीत आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपल्या परीनं झटाव असं कुणालाच कसं वाटत नाही ?

पगाराच्या तारखेची वाट बघत जगणारे आम्ही,  'ज्यांच्यामुळे ' आजचा हा दिवस बघतो आहोत त्यांची साधी जन्मतारीख सुद्धा लक्षात ठेवू शकत नाही . त्याचं बलिदान ,त्यांचा असीम त्याग  आमच्या लक्षात राहत नाही . 

कारण , आम्ही " भागांवाला "नाही आहोत ! 

आम्ही या  देशाचे सर्वात करंटे  आणि नालायक सुपूत्र आहोत .  .  . 







टीप  : - ( " भागांवाला "- सौभाग्यशाली - शहिद भगतसिंग यांचे लहानपणीचे नाव .) 

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

दाभोळकर "प्रसन्न" !

डॉ . दाभोळकरांना जाऊन महिना उलटून गेल्यावरही "तपास" चालू आहे .
डॉ . दाभोळकर गेल्यानंतरचा "साधना"चा पहिलाच अंक ! मुखपृष्ठ पाहिलं अन मनात विचारांचे काहूर उठलं …
… अस काय आहे त्या मुखपृष्ठावर ? गडद काळ्या पार्श्वभूमीवर शुभ्र अक्षरांमध्ये लिहिलं होतं कि ,
" स्वातंत्र्यासाठी प्राण देणारी अनेक माणसे महाराष्ट्राने पहिली आहेत .  समतेच्या वेदीवरही अनेकांनी प्राणार्पण केले आहे. पण ज्ञानविज्ञानाच्या महतीसाठी प्राणाची कुरवंडी ओवाळणारा 'नरेन्द्र दाभोळकर ' हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा आहे ! "
…मन एकदम महिनाभर मागे गेलं .  खरच , डॉक्टरांच्या निर्घुण हत्येने आमच्या समोर काही यक्ष प्रश्न उभे केले होते. परंतू , तशीच काही उत्तरही मिळाली . 
निद्रिस्त समाजमनाला अंत:र्मुख करणारी घटना ! असं या हत्येचं वर्णन केलं तर वावग ठरणार नाही .
जादूटोणा कायद्याचा १४ वर्षाचा वनवास संपला … पण त्यासाठी डॉ . दाभोळकरांच्या कुटुंबियांना आणि पर्यायाने समाजाला फार मोठी किमंत मोजावी लागली .
सरकारने ४८ तासात कायदा मंजूर केला . पण मग १४ वर्षं हे विधेयक का लटकल होतं ?
डॉ . दाभोळकरांच्या बलिदानाच्या वज्रदंडावरच पुरोगामी समतेच्या महाराष्ट्राची ध्वजा फडकणे कितपत योग्य आहे ?
हे प्रश्न वेदना निर्माण करणारे आहेत .
 ४८ तासात निर्णय घेणाऱ्या आणि अजूनही दाभोळकरांचे मारेकरी पकडू न शकलेल्या सरकारवर चहुबाजूने टीकेची झोड उठवली जात आहे .
अशा परिस्थिती मध्ये एका अजाण भीतीने किंवा राजकारण्यानांही भय वाटावं अशा मिडीयाच्या अनिर्बंध शक्ती पुढे नतमस्तक होऊन सर्व काही गप्पपणे बघणाऱ्या सर्वसामन्यांपैकी मीही एक …
डॉ . दाभोळकरांच्या हत्येनंतर विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाने बजावलेली भूमिका जशी प्रशंसनीय आहे . तेवढीच आक्षेपाह्र्यहि आहे !

डॉ . दाभोळकरांच्या कार्याचा महाराष्ट्राला करून दिलेला परिचय . त्यांचा त्याग ,त्यांचे बलिदान, त्यांचा विचार हा जसा सर्वसामान्यांपर्यंत या वृत्तवाहिन्यांनी पोहचवला .

तसाच ' डॉ . नरेन्द्र दाभोळकर' हा टीआरपी  FACTOR हि बनवला !!!
अधिक खोलात गेल्यास मी जे काही धाडसी विवेचन इथे करतो आहे ,त्याला मिडिया मधील तज्ञ मंडळीही दुजोरा देतील .. नव्हे तर , मिडिया मधील माझ्या काही मित्रांनी त्यांच्याच भाषेत "ऑफ द रेकॉर्ड " या गोष्टीची पुष्टीही केली आहे.
याच टीआरपी च्या ओढीने पुरेसा अभ्यास नसलेले अनेक मिडिया विचारवंत पुरोगामी विचारवंताच्या बुद्धीजीवी वर्गाचे आपणच प्रतिनिधी आहोत अशा आविर्भावात वावरू लागले .
वादग्रस्त विधाने करून अधिकाधिक व्ह्यूवरशीप " आपल्याला कशी मिळेल ,यासाठी विविध हातखंडे वापरू लागले .
सोशल मिडीयाचा गैरवापर समजतील अपप्रवृत्तीच घेतात यात काही अंशी तथ्य असले तरी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले हे तथाकथित विचारवंतही घेत आहेत.   

डॉ. दाभोळकरांच्या निर्घुण हत्येनंतर मिडीयावर चर्चा करणाऱ्यांपैकी एक आघाडीचा चेहरा म्हणजे श्री .प्रसन्न जोशी . यांनी आपल्या फेसबुक वॉल वर वादग्रस्त विधानांनी खचाखच भरलेला नवा कोरा लेख लिहिला आणि अपेक्षेप्रमाणे विरोध तसेच त्यांच्या बाजूने बोलणारे असे दोन गट तयार झाले . प्रतिक्रियांचा पाऊस पडला , इप्सित साध्य झाले !
मध्य पूर्वेतील देशांमध्ये सोशल मिडीयाने तेथील क्रांतिकारी उठावास कसा हातभार लावला ,याची रसभरीत वर्णने याच माध्यमांनी आपल्या पर्यंत यापूर्वी पोहोचवली आहेत .
सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना आपल्यावरही एक सामाजिक एकतेची जबाबदारी आहे याचे भानही या मंडळीनी राखले पाहिजे .

सदरच्या लेखात जोशीबुवांनी " माझा सार्वजनिक गणेशोत्सव आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक अथर्वशीर्षास विरोध आहे . " असे जाहीर करून टाकले .
…. आणि नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वृत्तांकनामधे हेच महाशय त्यांच्या वृत्तवाहिनी मधे अगदी विसर्जनाच्या दिवसापर्यंत आघाडीने दिसले . नव्हे तर , ' सेलिब्रेटी गप्पा' या कार्यक्रमात अभिनेता श्री स्वप्निल जोशी यांच्याशी शकुन-अपशकून च्या गप्पा मारतानाही त्यांना जनतेने पाहिले .
ज्या सार्वजनिक अथर्वशीर्षास विरोध त्यांनी दर्शविला होता . त्याचेच वृत्तांकन त्यांच्याच लोकप्रिय वाहिनीने केले .
पुरोगामी विचाराचा सच्चा पायीक असल्यासारखे "पुरोगामी -पुरोगामी " असा एकसारखा टाहो फोडणारे हे क्रांतिकारी विचारवंत स्वत: कार्यरथ असलेल्या संस्थेस मात्र परावृत्त करू शकले नाही .
सार्वजनिक गणेशोत्सवाचे वार्तांकन करताना या सगळ्या वृत्तवाहिन्यांना दाभोळकरांच्या विचाराचा सोयीस्कर विसर पडलेला दिसला . अनेक गणपती हे कसे नवसाला पावणारे आहेत , कुठल्या भक्ताने किती सोने देऊन नवस फेडला. याची रसभरीत वर्णने या वाहिन्यांवर दाखवली जात होती .       

या घटनाक्रमामुळे मला लहानपणी पाठ्यपुस्तकात असलेला "महापुरुषांचा पराभव " हा धडा आठवला !
महापुरुषांचे तथाकथित अनुयायीच कसे त्यांच्या विचारांचा पराभव करतात ,यावर हा धडा होता .
महात्मा फुले , राजश्री शाहू महाराज ,डॉ. आंबेडकर , गाडगेबाबा , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्वच महापुरुषांनी अनिष्ठ प्रथा ,चाली-रिती यांच्या विरोधात प्रबोधन केले .

महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला .

परंतु अंधश्रद्धा या केवळ गोर गरीब , अशिक्षित अथवा ग्रामीण भागाशीच संबंधित आहेत , या मताशी मी असहमत आहे .
जागतिकीकरणाच्या या युगामध्ये जीवघेणी स्पर्धा , नित्याचे ताण-तणाव, हताश झालेले मन आणि त्यातून आलेली अगतिकता यामुळे शहरी उच्चशिक्षित वर्गही या अनिष्ठ प्रथांमध्ये गुरफटत चालला आहे .
उच्चशिक्षितांच्या मानसिक दुबळेपणाचा , कमकुवत मनोवृत्तीचा गैरफायदा घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत . माझ्या ओळखी पैकीच एखाद्याचे सांगायचे झाल्यास , पदव्युत्तर शिक्षण आणि एका मोठ्या आय. टी कंपनी मधे कामाला असलेल्या माझ्या एका परिचिताने पती -पत्नी मधील लैंगिक अडचणीकरिता डॉक्टर ऐवजी एका बुवाचा दरवाजा ठोठावला होता . नुसताच दरवाजा ठोठावून हे महाशय शांत बसले नाहीत तर आपली सद्सद्विवेकबुद्धि गहाण टाकून बुवा महाराजांचा अलौकिक (?) स्पर्श झालेल्या अंगारयाची पुडी रात्री पत्नीच्या शरीरात ठेवून आले.

अजून एक अचंभित करणारा किस्सा या " आय टी वाल्या " मंडळींमध्ये सर्वश्रूत आहे .
'अमेरिकेचा विजा' मिळावा याकरिता हैदराबाद जवळील "चिल्कूर" या गावाला आपल्या पासपोर्ट ची झेरॉक्स प्रत ठेवून "नवस" बोलणारे शेकडो उच्चशिक्षित मी पहिले आहेत .
" विजा बालाजी " च्या मंदिरा मध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी हि उच्चशिक्षितांची गर्दी काय दर्शविते ?
केवळ कायद्यासाठी पाठपुरावा करून नव्हेतर कायदा संमत करून घेऊन आपली जबाबदारी संपली आहे का ?
या कायद्यात बसणाऱ्या कृत्यांबद्दल पिडीत व्यक्तींनी पुढ यावं याकरिता काही ठोस पावलं उचलावी लागणार आहेत .
न्यायमूर्ती रानडे , स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञानवादी समाजनिर्मितीचा ध्यास घेतलेले आणि विवेकाची  पताका खांद्यावर घेऊन चालणारे खरे वारकरी डॉ . नरेन्द्र दाभोळकर होते .
श्रद्धा-अंधश्रद्धा आणि अध्यात्म याही पलीकडे जाउन आपण "एका" विचाराचा सन्मान करणारे जाणते नागरिक कधी बनणार आहोत ?  हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे .

 मित्र हो, आपली श्रद्धा हि अखंड तेवत राहणाऱ्या नंदादिपासारखी असली पाहिजे , ती श्रद्धा आपल्याला 'प्रकाश' देते.. एवढेच नव्हे तर , ती भोवतालीही प्रकाश पसरविते  !

श्रद्धा हे उन्नतीचे माध्यम वा साधन आहे . अधोगतीला नेते ती अंधश्रद्धाच ! !
अन्याय ,अत्याचार ,अनीती, अनिष्ठ प्रथांनी भारलेल्या या देशात जे 'महाभारत' चालू आहे . त्यामधे "विचार" हे पांडवांचे प्रतिक आहे, तर 'विकार' हे कौरवांचे रूप आहे आणि "विवेक" नावाची शक्ती म्हणजे आज चा "श्रीकृष्ण आहे ! या श्रद्धा-अंधश्रध्येला आरूढ करून घेणारं आपलं मन हेच खंर "कुरुक्षेत्र " आहे.
मनाच्या या कुरुक्षेत्रावर विजय मिळवण्यासाठी विवेक नावाच्या शक्तीला विचारांची जोड दिल्यास दाभोळकर निश्चितच "प्रसन्न" होतील !